पुणे : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि श्री गणेशासमोर बीभत्स गाणी लावली जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. उत्सवातील ‘आव्वाजा’वर नियंत्रण ठेवायला हवे, ही नागरिकांची सार्वत्रिक भावना आहे. ती लोकप्रतिनिधीनेही व्यक्त केली असून, उत्सवाची ‘आवाजी’तयारी करणाऱ्यांच्या कानापर्यंत ती पोचावी, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.

डॉ. कुलकर्णी यांनी समाजमाध्यमात एक चित्रफित प्रसारित केली आहे. त्यात त्या म्हणतात,‘खूप मोठा आवाज जास्त काळासाठी ऐकावा लागल्यास त्रास होतो. आपल्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुले असतात, त्यांची काळजी घ्यायची असते. मोठ्या आवाजामुळे धडधड वाढते, कानांना त्रास होतो. तब्येतीवर काहीवेळा अंशकालीन, काही वेळा दीर्घकालीन परिणाम होतात. गणेशोत्सव असला, तरी या सगळ्यांबाबत आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आवाजाची मर्यादा नियमानुसार ठेवू या.’

हे ही वाचा…पुणे: मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे काँग्रेस भवनात आंदोलन, नाना पटोले यांना आंदोलनकर्त्यांचा घेराव

‘आपल्या हिंदू धर्माला, आपल्या देवतांना आवडतील का, याचा विचार करून गाणी निवडू या. ढोल-ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे. त्यात ताल आहे. पण, वादकांची संख्या मर्यादित ठेवूनही त्यात गोडवा टिकवला जाऊ शकतो. गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड याबाबत काटेकोर राहण्याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी,’असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.

गणेशोत्सवापूर्वीच महिना-दीड महिना सुरू होणारा ढोल-ताशापथकांच्या सरावाचा दणदणाट, गणेशोत्सवाच्या काळात लावले जाणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक आणि लेझरचे प्रकाशझोत यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो. या विरोधात अनेकदा नागरिकांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्या आहेत.

हे ही वाचा…पुणे: गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन,भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, पाच जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असल्याने डॉ. कल्याणी मांडके यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. त्यावर लवादाने, प्रत्येक गणेश मंडळाला १०० वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी, तसेच ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादकांचा समावेश करण्यास मनाई केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह पुणे पोलिसांना ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.