scorecardresearch

पुणे-मुंबई थेट विमानसेवा सोयीची की गैरसोयीची? विमानांच्या वेळांबाबत प्रश्नचिन्ह

पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाकडून ही सेवा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. असे असले तरी दोन्ही शहरांना जोडणारे एवढे पर्याय असताना थेट विमानसेवा का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Go First Suspend Flights

पुणे : पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडियाकडून ही सेवा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. असे असले तरी दोन्ही शहरांना जोडणारे एवढे पर्याय असताना थेट विमानसेवा का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याचबरोबर या विमानांच्या वेळेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबई आणि पुणे विमानतळांवरील उड्डाणांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असून, या थेट विमानसेवेमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी खूप काळापासून होत होती. अखेर थेट पुणे-मुंबई ही विमानसेवा २६ मार्चपासून सुरू होत असून, तिच्या तिकिटांसाठी नोंदणीही सुरू झाली आहे. पुणे-मुंबई हे अंतर रस्त्याने अथवा रेल्वेने साडेतीन तास ते चार तासांचे असून, विमानसेवेमुळे ते एका तासात पार करणे शक्य होणार आहे. याआधी पुणे-मुंबई ही थेट विमानसेवा जेट एअरवेजकडून सुरू होती, परंतु ती बंद करण्यात आली. पुणे ते मुंबई हा प्रवास विमानातून एका तासात होणार असला तरी विमानतळापर्यंत पोहोचणे आणि सुरक्षा तपासणी यात वेळ जाणार आहे. दोन्ही विमानतळे शहरांच्या मध्यवर्ती भागापासून काही अंतरावर असल्याने तेथून वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे विमानतळावर पोहोचणे आणि तेथून बाहेर पडणे या दोन्ही गोष्टींचा विचार करता रस्त्याने अथवा रेल्वेने पुणे-मुंबई प्रवासासाठी वेळ लागतो तेवढाच वेळ लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

हेही वाचा – व्हिडीओ ‘लाइक’ केला अन् संगणक अभियंता तरुणीची झाली २२ लाखांची फसवणूक

पुणे आणि मुंबई यांना जोडणारा द्रुतगती मार्ग असून, दोन्ही शहरांतील अंतर १५० किलोमीटर आहे. याचबरोबर दोन्ही शहरांना जोडणारी रेल्वेसेवाही आहे. आता थेट विमानसेवा सुरू होत आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही विमानतळांचा विचार करता गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे विमानतळ हे हवाई दलाच्या जागेत असल्यामुळे तेथील विमान उड्डाणांवर मर्यादा आहेत. याचबरोबर विमानतळाचा विस्तारही शक्य नाही. विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढल्याने विमानांच्या वेळा पुढे ढकलल्या जात असल्याचे चित्र अनेक वेळा दिसते. अशा परिस्थितीत पुणे-मुंबई ही थेट सेवा दोन्ही विमानतळांच्या क्षमतेवर ताण आणणारी ठरेल, असे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा सुरू असणार आहे. एअर इंडियाचे विमान मुंबईवरून सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी उड्डाण करेल आणि ते १० वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. पुण्यातून हे विमान सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईत १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. त्यामुळे सकाळच्या वेळी प्रवाशांना दोन्ही शहरांमध्ये प्रवास करता येईल. परंतु, रात्रीच्या वेळी परतण्यासाठी ही सेवा उपलब्ध नसेल, याबद्दलही अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा – राहुल गांधींना ‘त्या’ विधानाप्रकरणी शिक्षा सुनावल्याने पुण्यात काँग्रेसचे आंदोलन; पंतप्रधानांविरोधात जोरदार घोषणाबाजी

सर्वांत कमी अंतराचा हवाई मार्ग

पुणे ते मुंबई हा हवाई मार्ग १२४ किलोमीटरचा आहे. थेट विमानसेवेने जोडला जाणारा हा देशातील सर्वांत कमी अंतराचा हवाई मार्ग ठरणार आहे. देशातील सर्वांत कमी अंतराचा हवाई मार्ग कोझिकोड ते कन्नूर हा होता. तो ९५ किलोमीटर होता. एअर इंडियाने या मार्गावरील सेवा बंद केल्याने या मार्गावर सध्या थेट विमानसेवा नाही.

थेट पुणे-मुंबई विमानसेवा आधीही होती. तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. आता सकाळी लवकर आणि संध्याकाळी अशा वेळेत ही सेवा असणे आवश्यक आहे. या सेवेचा आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या आणि दुसऱ्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. रस्त्याने प्रवास टाळणारे आणि परदेशी नागरिक यांच्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरेल, असे हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:13 IST

संबंधित बातम्या