लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी खड्डे बुजविण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने आणि सार्वजनिक मंडळांनी मंडपासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे घेतल्याने गणेशोत्सावात खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे. त्यामुळे शहरात बहुतांश रस्त्यांवर खड्डे असल्याचे चित्र असून खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. दरम्यान, साडेसात हजार खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे.

सततच्या रस्ते खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे पुढे आले होते. बहुतांश प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेमार्फत शहरातील रस्त्यांची पाहणी करून घेतली. त्यामध्ये कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार १०० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये काँक्रिटच्या ८.३० किलोमीटर रस्त्यांचा समावेश तर उर्वरित ९१ किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-पिंपरीतील सांडपाणी वाहिन्यांचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण

डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्याची कामे महापालिकेच्या पथ विभागाने सुरू केलीत. मात्र प्रारंभीपासूनच याचा वेग कमी राहिला. त्यातच कामे घाईगडबडीत केल्याने कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र दहिहंडी आणि गणेशोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंडप टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावंर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याची वस्तुस्थिती आहे.

शहरातील अनेक मंडळे प्रमुख रस्त्यांवर आहेत. या मंडळांचे मंडप काही मीटर लांबीचे आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मंडपांच्या खांबांसाठी खड्डे घेण्यात आले आहेत. दरम्यान, उत्सवाच्या काळात पडलेले खड्डे सात दिवसांच्या आत बुजविण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची असल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खड्डे घेतल्याने रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. खड्डे दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून यंदा तीनशे कोटींचा खर्च केला जाणार आहे. मात्र हा खर्चही उधळपट्टी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा- शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन महिलेवर बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत सात हजार ७३९ खड्डे बुजविले आहेत. ३५५ चेंबर्सची दुरुस्ती महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. खड्डे बुजविण्यासाठी २७ हजार मेट्रिक टन डांबरयुक्त खडी वापरण्यात आली आहे. -साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग