पुणे : वारजे आणि कोथरूडला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपूल आणि टेकडीवरील उन्नत मार्गाचा मेट्रोच्या रचनेला अडथळा होण्याची शक्यता असल्याने सुधारित प्रकल्प आराखडा करण्याची सूचना महापालिकेने सल्लागाराला केली आहे. या आराखड्यात अन्य पर्यायांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. वारजे आणि कोथरूडला जोडण्यासाठी उड्डाणपूल आणि टेकडीवरून उन्नत मार्ग महापालिकेने प्रस्तावित केला आहे. त्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली होती. सल्लागाराने त्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेला सादर केला होता.
या आराखड्यानुसार कर्वे रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उड्डाणपूल प्रस्तावित असून उड्डाणपूल आणि उन्नत मार्ग एकत्र येणार आहेत. त्याचा परिणाम मेट्रोच्या रचनेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाने सुधारीत आराखडा करण्याची सूचना सल्लागाराला केली आहे. कर्वे रस्त्यावर आंबेडकर चौकात पाच रस्ते एकत्र येत असल्याने तेथे उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे. पण उड्डाणपुलाच्या उंचीमुळे मेट्रोच्या रचनेला अडथळा होऊ शकतो. त्यामुळे सल्लागाराने सादर केलेला अहवाल महापालिका प्रशासनाने न स्वीकारता त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : पाठ्यपुस्तके मराठीत करण्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबरपर्यंतची मुदत
यामध्ये समतल विगलक (ग्रेडसेपरेटर) किंवा इतर पर्यायांसह नवा आराखडा करण्यात येणार आहे, अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. कर्वे रस्त्यावरून पौड फाटा ते माणिकबाग हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. यास महापालिकेने मंजुरी दिली असून, आता महामेट्रोकडून तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान, वारजे आणि कोथरूड हे दोन्ही भाग जवळच्या रस्त्याने जोडावेत आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करावा यासाठी वनदेवी मंदिराच्या मागच्या टेकडीवरून विकास आराखड्यामध्ये रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे.