पुणे : खोदाईसाठी परवानगी दिल्यानंतर मनमानी पद्धतीने खोदाई केल्याच्या पोलिसांच्या ठेकेदाराचे प्रकरण लक्षात घेऊन महापालिकेने आता केबलची खोदाई करताना मार्किंग करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून २८८६ नवीन सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी महापालिकेने पोलीसांच्या ठेकेदाराला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली होती. मात्र संबधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने खोदाई केली. या प्रकारामुळे जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने आता हे पाऊल उचलले आहे. रस्ते खोदाई करताना ठराविक मीटरचे रस्ते खोदणे गरजेचे असताना ठेकेदाराने चक्क किलोमीटर मध्ये रस्ते खोदण्याचा सपाटा लावला होता.

महापालिकेने गृह विभागाने नेमलेल्या ठेकेदाराला आतापर्यंत ७५ किलोमीटर लांबीची खोदाई करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, खोदाई करताना संबधित ठेकेदाराने महापालिकेचे पदपथ, तसेच दुभाजक फोडले आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार आहे. ठेकेदाराने व्यवस्थितपणे रस्ते न खोदल्याने त्याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागणार आहे.

शहरात केबलसाठी खोदाई करायची झाल्यास, त्यासाठी महापालिका स्वतः मार्किंग करून देईल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही माहिती दिली. पोलिसांच्या प्रकल्पासाठी सुमारे ५५० किलोमीटरची खोदाई महापालिकेच्या हद्दीत केली जाणार आहे. ही खोदाई टप्प्याटप्प्याने करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच, आतापर्यंत ७५ किलोमीटरच्या खोदाईची परवानगी ठेकेदारास देण्यात आली आहे.

दिवाळीत खोदाई बंद महापालिकेने दिवाळीसाठी शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत हे काम बंद ठेवण्याचे आदेश ठेकेदारास दिले आहेत. त्याचबरोबर पुढील काळात खोदाई सुरू करण्यात येईल, तेव्हा ती कुठे करावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न होता, तसेच पुन्हा दुरुस्ती करायची झाल्यास कमीत कमी खर्च यावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.