पुणे : शहरातील महापालिकेची सात नाट्यगृहे तसेच सांस्कृतिक केंद्रांची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी १ कोटी २२ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित भीमसेन जोशी कलादालन यांचा समावेश आहे. संबंधित ठेकेदाराला हे काम करण्याची परवानगी देण्याबरोबर त्यांच्याशी करारासाठी मान्यता द्यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीसोर ठेवण्यात आला आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक उंदीर आणि मांजराचा खेळ नाट्यरसिकांना पाहायला मिळाला होता. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातदेखील नाटकाचा प्रयोग सुरू असताना एका महिलेच्या पायाजवळून उंदीर गेला होता. नाट्यगृहामध्ये खाद्यपदार्थ नेण्यासाठी मनाई असतानाही खाद्यपदार्थ नेले जात असल्याचे यानिमित्ताने उघड झाले होते. तसेच, नाट्यगृहे आणि कलादालनांमध्ये आवश्यक स्वच्छता होत नसल्याने उंदीर, घुशी, डास असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
या प्रकारानंतर महापालिकेने शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, कलादालने यांची स्वच्छता करण्यासाठी निविदा मागविल्या. यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, औंध येथील भीमसेन जोशी कलामंदिर, विजय तेंडुलकर नाट्यगृह – सहकारनगर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन, भीमसेन जोशी कलादालन – सहकारनगर यांचा समावेश आहे.
एका वर्षासाठी या निविदा काढण्यात आल्या असून, स्वच्छतेसाठी संबंधित ठेकेदार तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी एक कोटी २० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. तसेच, या ठिकाणी ४२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, असा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
दरम्यान, सांस्कृतिक शहर अशी पुणे शहराची ओळख आहे. महापालिकेने विविध भागांमध्ये नाट्यगृहे, सांस्कृतिक भवन, कलादालन उभारली आहेत. मात्र, अनेक नाट्यगृहांमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. महापालिका दर वर्षी नाट्यगृहांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. परंतु, त्यानंतरही अस्वच्छता, घाण आणि नाट्यगृहांच्या आजूबाजूच्या परिसरात कचऱ्यांचे ढीग अशा तक्रारी महापालिकेकडे येत असतात.
नाट्यगृहाचे नाव – स्वच्छतेचा खर्च – कर्मचारी
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – २३ लाख २६ हजार – ०८
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह – २३ लाख २६ हजार – ०८
पंडित नेहरू सांस्कृतिक भवन – २३ लाख २६ हजार – ०८
भीमसेन जोशी कलादालन, औंध – १७ लाख ४४ हजार – ०६
बाळासाहेब ठाकरे कलादालन – ११ लाख ६३ हजार – ०४
विजय तेंडुलकर नाट्यगृह – ११ लाख ६३ हजार – ०४
भीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर – ११ लाख ६३ हजार – ०४