पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील पावसाचे पाणी शिरणाऱ्या एकतानगर, विठ्ठलनगर आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरते.
गेल्या वर्षी २५ जुलै २५ ला सिंहगड रस्त्यावर असलेल्या एकता नगर आणि आजूबाजूच्या परिसरात धरणातून सोडलेले पाणी घुसले होते. त्यामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांच्या पार्किंग मध्ये पाणी शिरले होते. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांची नेते येथे आले होते.
एकता नगरीत पावसाळ्यात येत असलेल्या पुराच्या संकटापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले जातील. येथे क्लस्टर डेव्हलपमेंट केले जाईल. यासाठी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक तो निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले होते. या परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या पावसात देखील पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे येथे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी त्याबाबत माहिती दिली.
एकतानगर सोसायटीसह आजुबाजूला असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरते. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर हे पाणी या सोसायट्यांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मुसळधार पावसामुळे या भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरते. अचानक शिरलेल्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या काळात येथे भेट देऊन नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले होते.
या भागात असलेल्या सोसायट्या तसेच दुकानांचे विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’चा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडे आपत्ती निवारण निधी असतो. पंधराव्या वित्त आयोगानुसार एकतानगरी येथे आपत्ती निवारण निधी वापरता येऊ शकतो. त्यामुळे या भागासाठी ३०० कोटींचा आपत्ती निवारण निधी द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे २६ जून २०२५ रोजी पाठविला आहे.
‘वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्ताव महापालिकेने पाठविला आहे. या प्रस्तावावर अद्यापही राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, हे काम करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारकडून यासाठी निधी मिळेल, या भरवशावर महापालिकेने या कामासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलाआहे. या कामासाठी निविदा काढली जाणार आहे. हे काम जून २०२६ पूर्ण होऊ शकेल,’ असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.