पुणे : ‘यंदा पावसानंतर कोणत्याही भागात पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक ती काळजी महापालिकेने घेतली पाहिजे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून शहरातील सर्व नाल्यांची कामे पूर्ण झाल्याचा अहवाल, छायाचित्र आणि चलचित्रण मागवून घेऊन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा,’ अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला केल्या.
मान्सूनपूर्व तयारीबाबत महापालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मोहोळ यांनी महापालिकेत बैठक घेतली. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीतनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ यांनी बैठकीत घेतलेल्या आढाव्याची माहिती दिली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
‘कमी वेळात अधिक पाऊस पडत असल्याचे सध्या दिसते. त्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या पावसाळ्यात शहरातील कोणत्याही भागात पावसाचे पाणी शिरणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्या जागांची पाहणी करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत. मान्सूनपूर्व कामाची जबाबदारी असलेले ठेकेदार अपेक्षित काम करत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करणाच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
३९ ठिकाणी तात्पुरत्याच योजना
‘शहरात पूर्वी पाणी साठायचे, अशा (क्रॉनिक स्पॉट) ११७ जागा होत्या. महापालिकेत २२ गावांचा समावेश झाल्यानंतर ही संख्या २०१ वर पोहोचली. त्यापैकी ११७ जांगावर आवश्यक त्या उपाययोजना करून काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. ज्या ३९ जागांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामासाठी पुणे शहरासाठी केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो राज्य सरकारकडून महापालिकेला तातडीने कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील,’ असेही मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.