पुणे प्रतिनिधी : कोथरूड येथील गोळीबार प्रकरणी पुणे पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली. प्रकरणातील दोन्ही आरोपी गुंड निलेश घायवळ टोळीतील असल्याची माहिती समोर येताच, पोलिसांनी निलेश घायवळ विरोधात देखील गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणी निलेश घायवळचा शोध सुरू असताना, तो परदेशात पसार झाल्याची माहिती समोर आली.
निलेश घायवळवर गुन्हे दाखल असताना पासपोर्ट कसा मिळवला, या सर्व चर्चेदरम्यान, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार पिस्तूल देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी योगेश कदम यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
त्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवसापर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला.”
सर्व घडामोडी दरम्यान पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि कोथरूड भागात निलेश घायवळ टोळीकडून झालेल्या गोळीबाराबाबत प्रश्न विचारला असता, मुरलीधर मोहोळ यांनी बोलणे टाळले.