महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केलं. मात्र राज यांच्या या वक्तव्यावरुन मनसेमध्येच दुमत असल्याचं चित्र दिसत आहे.
राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही आपण वॉर्डमध्ये शांतता राखण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतलीय. असं असतानाच आता पुण्यातील कोंढावा येथे राज यांनी उद्धाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचं नाव काढून टाकण्यात आलंय.




नक्की वाचा >> “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते; ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…”; संजय राऊतांना मनसेचा खोचक टोला
कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण २०१३ साली मनसे अध्यक्षांच्या हस्ते झाले होते. मात्र राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. राज यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नावाला काळं फासलं आहे.
दरम्यान, या गुढीपाडव्याच्या सभेनंतर निर्माण झालेले प्रश्न आणि टीकेला राज ठाकरे ९ एप्रिल रोजी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये उत्तर देणार असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…
दरम्यान, कालच राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढलीय का असा प्रश्न वसंत मोरेंनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. पुढे बोलताना मोरे यांनी, “राज ठाकरेंनी जो शब्द वापरला तो, ‘जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर..’ असा होता. मी स्टेजवर होतो, मी भाषण ऐकलं आहे. तर भोंगे कुणी काढायचे आहेत. सरकारने भोंगे काढायचेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी,” असं म्हटलंय. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
स्थानिक पातळीवर भोंग्यांविरोधातील भूमिका ही वसंत मोरे यांना त्यांच्या तसेच साईनाथ बाबर यांच्या वॉर्डमध्ये पक्षाच्या विरोधात जाणारी ठरु शकते असं वाटतं असल्याचंही म्हटलंय. “आमची भूमिका ही वादग्रस्त भूमिका ठरु शकते. त्याचा परिणाम लोकप्रितिनीधी म्हणून निवडून येताना होऊ शकतो. मी झालं साईनाथ (बाबर) झालं. साईनाथच्या वॉर्डात ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आम्ही त्यांच्यात जाऊन असंख्य कामं केलेली आहेत. राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही तर कार्याकर्त्यांनी थोडं शांततेनं घेतलं पाहिजे असं वाटतं,” असं स्पष्ट मत मोरे यांनी व्यक्त केलंय.