पुणे : भारत-पाकिस्तानदरम्यान तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमुळे महापालिकेच्या यंत्रणेतील अनेक त्रुटी समोर आल्या. महापालिकेच्या आवारात यंत्रणांना दक्ष करण्यासाठी भोंगा नसल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, तर अग्निशामक यंत्रणादेखील योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे स्पष्ट झाले.
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्ध झाल्यास नक्की काय करावे, नागरिकांची काळजी कशी घ्यावी, यासाठी केंद्र सरकारने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य भवनाच्या इमारतीमध्ये बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास मॉक ड्रिल झाले. यामध्ये नागरी संरक्षण दल, अग्निशामक दल, वैद्यकीय अधिकारी, पोलिस विभाग, महापालिकेचा सुरक्षा विभाग, तसेच संकट व्यस्थापन विभागाने सहभाग घेतला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मॉक ड्रिलबाबत सर्व उपस्थित कर्मचारी, अधिकारी, तसेच महापालिकेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सविस्तर माहिती दिली. संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास काय करावे, कशी काळजी घ्यावी, सर्व यंत्रणांना कसे सहकार्य करावे याबाबत मार्गदर्शन केले. मॉक ड्रिल झाल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. महापालिकेत दररोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. तसेच, महापालिकेत विविध विभागांमध्ये शेकडो अधिकारी, कर्मचारी काम करतात. अचानक आग लागली, तर सर्वांना सूचना मिळावी, यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारा भोंगाच महापालिकेकडे नाही.
दुर्घटना घडल्यास योग्य समन्वय ठेवून नागरिकांना महापालिकेच्या बाहेर सुरक्षितपणे काढण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडे संपर्क यंत्रणा (वॉकीटॉकी) नसल्याचे यानिमित्त समोर आले. सुरक्षारक्षकांना एकमेकांशी संपर्क करण्यासाठी वॉकीटॉकी द्यावेत, अशी मागणी गेले तीन वर्षांपासून केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले. अनेक कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्प्रिंकल बंद पडलेले आहेत.
युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत मॉक ड्रिल घेण्यात आले. या वेळी काही यंत्रणा काम करीत नसल्याचे दिसून आले. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांची पाहणी करून त्रुटी दूर केल्या जातील. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका