पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवासी दरात वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी सरासरीपेक्षा ५५ लाख रुपयांचे उत्पन्न जास्त मिळाले आहे. विशेष म्हणजे रविवारी नियोजनापेक्षा एक हजार बस मार्गिकांवर नसताना एक हजार ५५४ बसमधून नऊ लाख ४५ हजार ९७१ प्रवाशांनी प्रवास केला. दिवसभरात ‘पीएमपी’ला एक कोटी ९७ लाख १७ हजार ४३० रुपये महसूल मिळाला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरापर्यंत दिवसाला एक हजार ६५० बस वेगवेगळ्या मार्गांवरून धावतात. ‘पीएमपी’ प्रशासनाने एक जूनपासून प्रवासी भाडेवाढ लागू केली. एक ते पाच किलोमीटरसाठी किमान दहा रुपये प्रवासी भाडे निश्चित केले आहे. दिवसभरात सरासरी एक कोटी ४२ लाख १५ हजार २३१ रुपये उत्पन्न मिळते. सुट्टीचा वार असल्याने एक हजार ५५४ पीएमपी विविध मार्गिकांवर सोडण्यात आल्या. यावेळी नऊ लाख ४५ हजार ९७१ प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला असून, एक कोटी ९७ लाख १७ हजार ४३० रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी अनेक मार्गांवर प्रवाशांची मागणी नसते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने संचलनात घट केली होती. भाववाढीच्या पहिल्याच दिवशी रविवार असताना पीएमपीला इतर दिवसापेक्षा सरासरी ५५ लाख दोन हजार १९९ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. ही चांगली बाब असून पीएमपीच्या सेवेत मोठे बदल करण्यात येतील, अशी माहिती संचलन विभागाचे मुख्य व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.