सनदी लेखापालाकडे तीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने डेक्कन जिमखाना परिसरात पकडले.
किरण रामदास बिरादार (वय २४, रा. उदगीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सनदी लेखापालाने गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडे तक्रार केली होती. मुकुंदनगर भागात वास्तव्यास असलेल्या सनदी लेखापालाच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला होता. आरोपीने सनदी लेखापालाकडे तीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सनदी लेखापालाने याबाबत तक्रार केल्यानंतर युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खंडणी मागणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> लक्ष्मण जगतापांच्या निधनापूर्वी भाजपाची पोटनिवडणूकीची तयारी; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
आरोपी बिरादारने महापालिका भवन त्यांना दहा लाख रुपये घेऊन बाेलावले. त्यानंतर त्याला संशय आला. त्याने खंडणी घेण्यासाठी पुन्हा वेगळे ठिकाण निवडले आणि डेक्कन जिमखाना भागातील गरवारे पुलाजवळ सनदी लेखापालाला बोलावले. पोलिसांनी तेथे सापळा लावला. तपास पथकाने बनावट नोटांचे बंडल असलेली पिशवीत झुडपात ठेवली. आराेपी बिरादार तेथे आला आणि त्याने झुडपात ठेवलेली पिशवी उचलली. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच बिरादार तेथून पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, उज्ज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, मोहसीन शेख, संजय जाधव, उत्तम तारु आदींनी ही कारवाई केली.