पुणे : मेफेड्रोन (एमडी) विक्री करणाऱ्या सराइताला वानवडी पोलिसांनी अटक केली. लुल्लानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराइताकडून एक लाख ३६ हजारांचे ६ ग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रोहन प्रकाश अंगारके (वय २२, रा. मार्केट यार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वानवडी पोलिसांचे पथक लुल्लानगर भागात गस्त घालत होते. त्यावेळी अंगारके हा मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी दीपक क्षीरसागर, अभिजित चव्हाण यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगारके कोणाला अमली पदार्थ विक्री करणार होता, तसेच त्याला अमली पदार्थ कोणी विक्रीस दिले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपळ मदने, यतीन भोसले यांनी ही कारवाई केली.