पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालायात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तीन हजार १५० पानी आहे. आरोपपत्रातून पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सूत्रधार ललित अनिल पाटील (वय ३७, रा. नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, सध्या रा. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर), भूषण अनिल पाटील (वय ३४), अभिषेक विलास बलकवडे (वय ३६), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे (वय ३९), जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, सर्व रा. नाशिक), रेहान उर्फ गोल आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), राहुल पंडीत उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (वय ३०, सध्या रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबुराव कांबळे (वय ३२, रा. मंठा, जि. जालना), इम्रान शेख उर्फ अमिर आतिक खान (वय ३०, रा. धारावी. मुंबई), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय २९, रा. वसई, पालघर) अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा…कोरेगाव पार्कात पोलीस उपनिरीक्षक मृतावस्थेत, पोलीस दलात खळबळ

चाकण परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. आजारी असल्याची बतावणी करून तो ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ससून रुग्णालयातून त्याने साथीदारांच्या मदतीने मेफेड्रोन विक्री सुरू केली होती. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ससून रूग्णालयाच्या आवारात सापळा लावून ललितच्या साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. ससूनच्या आवारातून अमली पदार्थ विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

त्यानंतर ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेणारा ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. ललितला पसार होण्यात मदत केल्याच्या आरोपावरुन पोलीस, कारागृह रक्षक, डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणात चार पोलिसांना निलंबित करण्यात आले. सहा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले. पसार झालेल्या ललितला चेन्नई परिसरातून अटक करण्यात आली.

हेही वाचा…पुणे: धक्कादायक! पैशांच्या वादातून पतीने केली पत्नी अन् मुलीची हत्या

तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकेळ, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीस गोवेकर आणि पथकाने ही कारवाई केली. विशेष सरकारी वकील ॲड. विजय फरगडे सरकार पक्षाकडून काम पाहत आहेत.

हेही वाचा…पुणे : मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर ‘शेअर’ रिक्षाची सुविधा, महामेट्रोबरोबरच्या बैठकीत निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिकमध्ये मेफेड्रोन निर्मिती; १०० साक्षीदारांची यादी

तपासात पुणे पोलिसांना मेफेड्रोन तस्करी, विक्रीची माहिती मिळाली. ललित आणि साथीदारांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात बंद पडलेल्या कारखान्यात मेफेड्रोन निर्मिती सुरू केली होती. अमली पदार्थ तस्करी, विक्रीचे जाळे त्याने साथीदारांच्या मदतीने निर्माण केले होते. तो बड्या तस्कराच्या संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. ललितने साथीदारांच्या मदतीने तस्करी केली. याप्रकरणी ललितसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात अलाी होती. पोलिसांनी आरोपपत्रात १०० हून जास्त साक्षीदारांची यादी जोडली आहे.