पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकातील पोलीस बसमधून प्रवास करून, छेडछाड आणि चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार असल्याने महिला प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे.

प्रवासात महिलांचे दागिने आणि पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. तसेच महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणे किंवा छेडछाड करणे, अशा घटना घडत असतात. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील पोलीस कोणत्याही वेळी बसमधून प्रवास करून तपासणी करणार आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांच्या हद्दीपर्यंत वाहतूक सेवा देणारी ‘पीएमपी’ ३८१ मार्गिकांवरून धावते. दिवसाला आठ ते दहा लाख प्रवासी विविध मार्गांवरून प्रवास करतात. प्रवासात चोरीसह अनुचित घटना घडत असल्याबाबत पीएमपी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी पीएमपीने केली होती. त्यानुसार पोलिसांकडून आता पथक नेमण्यात आले आहे.

बस पोलीस ठाण्यात नेण्याच्या सूचना

महिला किंवा विद्यार्थिनींना त्रास दिल्याचा प्रकार घडल्यास बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा आदेश पीएमपी प्रशासनाने वाहक आणि चालकांना दिला आहे. संबंधिताविरोधात तक्रार देऊन त्याची माहिती पीएमपीचा अपघात विभाग आणि पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

असे असेल पथक

महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या पथकामध्ये दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन करून ‘पीएमपी’तील वर्दळ असणाऱ्या स्थानक आणि मार्गांवर गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकातील पोलिसांकडून बसने प्रवास करून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे. – सतीश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक, संचलन विभाग, पीएमपी