पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालक, तसेच व्हॅनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिला.
पुणे पोलीस आयुक्तालयात शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक बुधवारी पार पडली. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भाेसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम या वेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी वाहतूक करणारे रिक्षाचालक, व्हॅनचालक, तसेच शाळेची आहे. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, तसेच महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. वाहनचालक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी करावी. त्यांची वैद्यकीय तपासणीही करावी. रिक्षातून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. नियमांचे पालन न करणारे रिक्षाचालक, व्हॅनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. वाहनांची नियमित तपासणी (फिटनेस टेस्ट) करण्यात यावी, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.