पुणे : गर्दीच्या भागातून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाइल संचाचा डेक्कन पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांनी तक्रारदारांना नुकतेच साडेचार लाख रुपयांचे २६ मोबाइल संच परत केली. पोलिसांच्या कामगिरीमुळे तक्रारदारांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांनी पोलिसांचे कौतुक केले.

केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून ‘सेंट्रल इक्विपमेंट आय़डेंटी रजिस्टर’ (सीईआयआर) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीवर गर्दीच्या भागातून गहाळ झालेले, तसेच चोरीला गेलेल्या मोबाइल संचांबाबत तक्रार नोंदविण्यात आली होती. डेक्कन पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाइल संचाबाबतच्या तक्रारींची पडताळणी केली. डेक्कन भागातून गहाळ झालेल्या मोबाइल संचाबाबत तक्रार करणाणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली. त्याद्वारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुुरू केला.

गहाळ किंवा चोरलेले मोबाइल संच परगावात, तसेच परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाइल संच वापरणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून मोबाइल संच डेक्कन पोलीस ठाण्यात परत करावेत, अशी सूचना केली. पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव त्यांना करुन देण्यात आली. गहाळ झालेले २६ मोबाइल संच परत करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तक्रारदारांशी संपर्क साधला. डेक्कन पोलीस ठाण्यात एका छोटेखानी कार्यक्रमात मोबाइल संच परत करण्यात आले.

या वेळी तक्रारदारांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक करुन पाेलिसांचे मनोमन आभार मानले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक् ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस कर्मचारी उमा पालवे आणि पथकाने ही कामगिरी केली. शिवाजीनगर पोलिसांनी गहाळ झालेले मोबाइल संच शोधून तक्रारदारांना नुकतेच परत केले. नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाइल संचाचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

पोलिसांचे आवाहन

मोबाइल हरविल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर ( punepolice.gov.in/lost Found Reg.) येथे करावी. तक्रार नोंदविताना जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव नोंदवावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा करावी. मोबाइल संच हरविल्यानंतर तोच मोबाइल क्रमांक वापरावा. नवीन सीमकार्ड सुरू झाल्यानंतर ‘www.ceir.gov. in’ या संकेतस्थळावर नोंद करावी. त्याची प्रत संबंधित पोलीस ठाण्यात आणून द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.