पुणे : पुणे शहरातील विमाननगर येथील म्हाडा कॉलनीमधून तीन वर्षाच्या मुलीचे दोन आरोपींनी अपहरण करण्याची घटना काल घडली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना चार तासात जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले असून कामावरून काढून टाकल्याने तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,विमाननगर येथील म्हाडा कॉलनीमधून काल दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास एका तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी आमच्याकडे देताच,आम्ही शहरातील विविध भागात आमच्या टीम रवाना केल्या. प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल या दोघांनी मुलीचे अपहरण केल्याची शक्यता मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. त्यानंतर आम्ही संशयित आरोपीचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते दोघेजण मुंबईला रेल्वेने जात असल्याचे मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून दिसून आले. त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक रेल्वे स्टेशन येथील पोलिसांना आरोपी बाबत माहिती कळवली.तसेच आमच्या टीम देखील मुंबई च्या दिशेने रवाना केल्या.

त्याच दरम्यान आरोपी प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल या दोघांना कल्याण रेल्वे स्टेशन येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांकडे चौकशी केली असता, आम्हाला बांधकाम साईटच्या कामावरून काढून टाकले. त्यामुळे आम्ही मुलीचे अपहरण केले.तसेच आम्ही मुलीच्या वडीलांकडे खंडणी देखील मागणार होतो, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तसेच या प्रकरणात अन्य काही आरोपी असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.