संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये नागरिक नियमांचा भंग करत रस्त्यावर येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत लोकांवर नियंत्रण ठेवताना पोलीस यंत्रणेवर ताण पडतो आहे.

महाराष्ट्रात पुणे शहरालाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. यावेळी शहरात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पुणे पोलिसांनी सध्याच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना एक आव्हान दिलंय. ज्यांना या काळात घराबाहेर पडायचं आहे, त्यांनी खुशाल पडावं…मात्र त्याआधी रेड झोनमध्ये पोलिसांसोबत ६ तास ड्युटी करुन दाखवायची, आहे मंजूर?? अशा आशयाचं ट्विट करत पुणे पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना शालजोडीतले लगावले आहेत.

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. या काळात पोलीस यंत्रणाही सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीया आहेत. मुंबई पोलिसांमागोमाग पुणे पोलिसही सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने सक्रीय असतात. अनेक गरजू लोकांना पोलिसांनी या माध्यमातून मदत केलेली आहे. दरम्यान पुण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ९८० च्या घरात पोहचली असून ६४ जणांनी आपले प्राण गमावले आहेत..