पुणे : मसाल्याचे पदार्थ घरामध्ये भाजून घेतल्याने द्विगुणित झालेली मसाल्याची चव, दररोज ताज्या मिरच्यांचा केलेला ठेचा, उत्तम प्रतीचे फरसाण, खारे शेंगदाणे, उकडलेल्या बटाट्याचे काप अशा मिश्रणातून तयार केलेली आणि सामान्य नागरिकांपासून नाट्य-चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांची लाडकी ‘पूनम भेळ’ मंगळवारी (१ जुलै) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
माॅलमध्ये खाद्यपदार्थ खाण्याबरोबरच ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याच्या जमान्यातही पुणेकरांच्या चवीचे चोचले पुरवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पूनम भेळचे संचालक सज्ज आहेत. पुण्याचे नगरनियोजन करणारे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांनी बोलावून घेतल्यानंतर नाशिक येथून पुण्याला स्थायिक झालेल्या फावडे कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
‘आजोबा नाशिक येथे चिवडाविक्रीचा व्यवसाय करत होते. हा चिवडा आवडल्यामुळे स. गो. बर्वे यांनी बाबूराव फावडे यांना पुण्याला बोलावून घेतले. त्या वेळी नव्याने विकसित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दुकानाचा परवाना दिल्याने १ जुलै १९५१ पासून आजोबांनी येथे चिवडाविक्री सुरू केली. त्या वेळी एक आणा, दोन आणे आणि चार आणे अशी चिवड्याची किंमत होती. व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर वडील मधुकर फावडे यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिनमधील नोकरी सोडली. त्यांनी चिवडा तर विकलाच; पण जोडीला भेळ आणि पाणीपुरी सुरू केली. आजोबा आणि वडिलांना भाऊसाहेब शिरोळे यांनी प्रोत्साहन दिले. मी आणि बंधू वासुदेव, आम्ही सात-आठ वर्षांचे असल्यापासून दुकानामध्ये येऊन वडिलांना मदत करायचो,’ अशी माहिती पूनम भेळचे संचालक परशुराम फावडे यांनी सांगितली.
‘पूर्वी उद्यान दिवसभर खुले असायचे. आता उद्यानाची वेळ दुपारी चार ते रात्री साडेआठपर्यंत निश्चित केल्यामुळे ग्राहकांची संख्या घटली. फुलराणी, इलेक्ट्रिक खेळणी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास उद्यानामध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढेल. त्याचा परिणाम आमच्या व्यवसायाची वाढ होण्यामध्ये होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. काँग्रेस नेते रामकृष्ण मोरे, प्रकाश ढेरे यांच्यासह त्या वेळचे नगरसेवक भेळ खाण्यासाठी येत असत. ‘उंबरठा’ चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यात डाॅ. जब्बार पटेल हे स्मिता पाटील यांना भेळ खाण्यासाठी घेऊन आले होते. ‘पुरुष’ नाटकाच्या प्रयोगावेळी नाना पाटेकर आवर्जून पाणीपुरी खायला येत असत. नाटकाचे प्रयोग असतील, तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे भेळ मागवून घ्यायचे.- परशुराम फावडे, संचालक, पूनम भेळ