वाढत्या करोना रुग्णाची संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले.

राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं खुली न केल्यास, आम्ही मनसेच मंदिरं उघडेल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी मंदिरातील ‘देव बोले, उघडा दार उद्धव आता उघडा दार उद्धवा’, ‘मोर्चे चालू यात्रा चालू मग मंदीर बंद का ?’,’ उद्धवा अजब तुझे सरकार…!’, ‘आई राजा उदो उदो बिघाडी सरकारला उठव…’,असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तर यावेळी मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, राज्यात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. पण आपल्या राज्यातील मंदिरं अद्याप पर्यंत सुरू झालेली नाही. मंदिरं बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या मंडळीचा व्यवसाय ठप्प आहे. तसेच त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबतचा विचार सरकारने लवकरात लवकर करावा. आज आम्ही घंटानाद आंदोलन केले आहे. सरकारने मंदिरं भाविकांसाठी लवकरात लवकर खुली न केल्यास, तर आम्हीच मंदिरं खुली करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.