पुणे : रेल्वे दळणवळणामध्ये सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुणे रेल्वे विभागाकडून ‘व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी’ (व्हीएचएफ) ही यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे. या प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून रेल्वे कर्मचाऱ्यांमधील संवादाचे मुद्रण (रेकॉर्डिंग) करणे शक्य होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकासह रेल्वे मार्गावरील बोगदे, दुर्गम स्थानकांवर आणि प्रमुख ठिकाणी अत्याधुनिक ‘व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी’ (व्हीएचएफ) ही रेडिओ प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.
‘पुणे रेल्वे स्थानकासह इतर स्थानकांवर आणि मुख्य कार्यालय, मदत कक्षामध्ये ‘व्हीएचएफ’ प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये पूर्वी संवादाचे मुद्रण होत नव्हते. याच प्रणालीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून संवादाचे मुद्रण करता येणार आहे. जवळपास तीन महिने मुद्रण साठवून ठेवता येईल,’ अशी माहिती मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.
रेल्वे सेवेत अचानक झालेला तांत्रिक बिघाड, अपघाताची घटना घडल्यानंतर तपासात घटनेचे कारण स्पष्ट होत नव्हते. तसेच, खराब हवामानामुळे बोगद्यांमधून संवादाला अडचणी येत होत्या. ‘व्हीएचएफ’ यंत्रणा अद्ययावत झाली, तर अपघातापूर्वी किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास रेल्वे चालक (लोको पायलट) यांच्या संवादाचे मुद्रण होणार आहे. अतिउच्च प्रणालीमुळे संवादामध्ये सुलभता निर्माण होईल. बिघाड झाल्यास तातडीने मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल, कर्जत, लोणावळा, नाशिक विभागातील कसारा, इगतपुरी या रेल्वे मार्गावरील बोगद्यांमध्ये तसेच इतर ठिकाणी या प्रणालीचा अवलंब करण्यात येत असताना पुणे रेल्वे प्रशासनाकडून ही अद्ययावत प्रणाली बसविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जवळपास ४.७ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कसा होणार फायदा ?
त्वरित आणि सुस्पष्ट संवाद साधता येणार
कर्मचाऱ्यांच्या संवादाचे मुद्रण होणार असल्याने आपात्कालीन परिस्थितीचा अंदाज येणार
अपघातासारखी दुर्घटना घडल्यास तपास करणे सोपे होणार
कर्मचारी अंतर्गत सुसंगती फायदेशीर ठरणार.
गर्दी, गोंगाट किंवा इतर कर्कश्श आवाजाचा संवादावर परिणाम होणार नाही.
पुणे रेल्वे स्थानकासह इतर स्थानकांवर आणि मुख्य कार्यालय, मदत कक्षामध्ये ‘व्हीएचएफ’ प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये पूर्वी संवादाचे मुद्रण होत नव्हते. याच प्रणालीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून संवादाचे मुद्रण करता येणार आहे. जवळपास तीन महिने मुद्रण साठवून ठेवता येईल. या प्रणालीसाठी रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाली असून, ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ४.७ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.