पुणे : शहरात बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा फटका धायरीगाव, डीएसके विश्व आणि परिसराला बसला आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारांगणे मळ्यातील विहिरीत नाल्याचे पाणी गेले. घाण पाणी विहिरीत गेल्याने जलस्रोत दूषित झाले आहे. त्यामुळे हे पाणी उपसा करून बाहेर काढून विहीर स्वच्छ करण्यात येणार असल्याने भागातील नागरिकांना पुढील दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही.

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, धायरी, नांदेडगाव या भागांत काही महिन्यांपूर्वी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळले होते. यात काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. येथील पाण्याची तपासणी केल्यानंतर दूषित पाण्यामुळेच जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले होते.

या भागाला बारांगणे मळा परिसरात असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने येथील नाल्याचे पाणी वाढले. सांडपाणी वाहिनीतून मैलापाणी बाहेर पडले. हे घाण पाणी विहिरीत पडले. याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा त्वरित बंद करण्यात आला आहे. ‘विहिरीतील घाण पाणी बाहेर काढून, स्वच्छ केली जाईल. त्यानंतरच धायरी, डीएसके विश्व व अन्य भागात पाणी पुरवठा केला जाईल,’ असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महापालिकेने धायरी गावासाठी टँकर पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, डीएसके विश्वमधील महापालिकेचे १० टँकर पुरसे नाहीत, त्यामुळे येथे पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ही विहीर स्वच्छ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवस तरी लागतील,’ असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.