गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कोकणसह पुण्यात कोसळणारा धुवांधार पाऊस आणखी काही दिवस अशाच प्रकारे कोसळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे शहराला पुढील ७२ तास अजूनही अतिवृष्टीचे आहेत. त्यामुळे ९ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने वाहतूकीसाठी सुमारे सहा पूल बंद करण्यात आले आहेत. मावळ, मुळशी तालुक्यांमधील धरणांच्या परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना नद्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या सर्व पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) केल्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत.
पुणे शहर आणि परिसरामध्ये सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. सोमवारीही शहरात पूरस्थिती असल्याने नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मंगळवारीही शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणलोट क्षेत्रात सध्या मोठय़ा प्रमाणावर पाऊस असल्याने धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून शहरात पूरस्थिती आहे. विविध पुलांना पाणी लागल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सहा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये राजीव गांधी पूल (औंधगाव ते डांगे चौक मार्ग), जुना सांगवी पूल (स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग), दापोडी पूल (भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग), जुना होळकर पूल (खडकीबाजार ते साप्रस मार्ग), पुणे शहरातील बाबा भिडे पूल आणि महापालिका भवन जवळील जयंतराव टिळक पूल असे सहा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. धरणक्षेत्रांत पडणारा पाऊस आणि धरणांमधून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग यावर हे पूल वाहतुकीसाठी कधी खुले करणार हे अवलंबून आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर, बंद ठेवण्यात आलेल्या या पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतुकीची माहिती punetrafwatch.com या वेबपेजवर जाऊन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी या वेळी केले.
रविवारी-सोमवारी शहरात दिवसभर पावसाच्या सरी होत्या. शनिवारी मध्यरात्रीनंतरही शहरात जोरदार पाऊस झाला. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात ११ ऑगस्टपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये शहरात ४१ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत ७०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाळी स्थितीमुळे शहरातील तापमानात घट झाली आहे. आठवडाभर कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे.