पुणे : गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सप्टेंबरमध्ये शहरात जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. शुक्रवारपर्यंत शिवाजीनगर येथे २३७.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाचा सप्टेंबरमधील पाऊस गेल्या दहा वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचा ठरला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

छत्तीसगड, ओडिशा या राज्यांवर निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राचा पश्चिमेकडे होणारा प्रवास, राज्यावरील चक्रीय स्थिती अशा कारणांनी राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुणे शहर आणि परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. पुणे जिल्हा, घाटमाथ्यासाठी यलो अलर्टही देण्यात आला होता. हवामान विभागाच्या गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता सप्टेंबरमध्ये शिवाजीनगर येथे २०१९मध्ये सर्वाधिक २८७.७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे, तर २०१८मध्ये सर्वांत कमी ३०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदाही सप्टेंबरच्या पूर्वार्धात शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे आतापर्यंत शिवाजीनगर येथे २३७.०४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक ठरला आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, सप्टेंबरमध्ये दिवसभरात वाढणारे तापमान, हवेतील आर्द्रता अशा अनुकूल स्थितीमुळे मेघगर्जनेसह पाऊस पडतो. अशा वेळी कमी वेळात जास्त पाऊस होतो. एका दिवसात ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या घटना या पूर्वीही घडल्या आहेत.

गेल्या पाच वर्षांतील सप्टेंबरमध्ये शिवाजीनगर येथील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

२०२० – १९८

२०२१ – ८३.६

२०२२ – २३२

२०२३ – १६५.७

२०२४ – २०७.८