पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता या मार्गांवरून मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस मार्गात बदल करण्यात आले आहत.

भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून दुपारी चार वाजता मिरवणूक निघणार असल्याने भवानीमाता मंदिर परिसराचा रस्ता बंद केल्यानंतर पुलगेट, गोळीबार मैदान, स्वारगेट, रामेश्वर चौक, कुमठेकर रस्ता या मार्गाने बसची वाहतूक होणार आहे. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता मार्गावरून जाणाऱ्या बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या मार्गावरील बस जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन, लोकमान्य़ टिळक चौक, कुमठेकर रस्ता, विश्रामबाग वाडा, मंडई मार्गे स्वारगेट चौकात येऊन नेहमीच्या मार्गाने पुढे जातील. मनपा भवनकडून शिवाजी पुतळा येथील रस्ता बंद करण्यात येणार असल्याने या मार्गावरील बस ढोले पाटील रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता मार्गाने पुढे जातील, तर या मार्गावरून येताना जंगली महाराज रस्त्याने मनपा भवनाच्या दिशेने पुढे जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या बस पुणे स्थानक, पोलीस आयुक्त कार्यालय, वेस्ट एंड टॉकीज, महात्मा गांधी बस स्थानक, गोळीबार मैदान, स्वारगेट आणि तेथून पुढे मार्गस्थ होतील. फडके हौद, दारुवाला पूल वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने पुणे स्थानकाकडे जाताना कुंभारवाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे, तर येताना पुणे स्थानक, गाडीतळ, कुंभारवाडा, मनपा भवन, डेक्कन जिमखाना आणि पुढे असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.