पुणे : शहरातील ८० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि अस्वच्छतेने त्रस्त असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच, ८५.७ टक्के ज्येष्ठांना सार्वजनिक शौचालय नसणे, ९१.७ टक्के ज्येष्ठांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा त्रास होत असल्याचेही या सर्वेक्षणातून अधोरेखित करण्यात आले आहे.
कर्वे समाज सेवा संस्था आणि लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ‘ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून शहरी पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छता आणि नियमांचे पालन’ या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला.
लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाचे राजीव शास्त्री यांच्या संकल्पनेतून, तर कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ. महेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. संशोधनासाठी प्रत्यक्ष भेट आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून सुमारे १९० ज्येष्ठ नागरिक संघ आणि १२०० ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्यात आली.
सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, शहरातील ८० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास होत आहे. तसेच, सार्वजनिक शौचालये आणि अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पदपथावरील अनधिकृत दुकाने, गर्दी, मध्येच लावलेली वाहने यांमुळे ज्येष्ठांना चालतानाही अडचणी येतात. तसेच वाढत्या शहरीकरणाने ज्येष्ठांसमोर अनेक आव्हाने, समस्या निर्माण झाल्या आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.
ज्येष्ठांना होणारा त्रास
- वायुप्रदूषण – ८३.५ टक्के
- ध्वनिप्रदूषण – ८५.२ टक्के
- असमाधानकारक स्वच्छता – ८४.४ टक्के
- विरुद्ध दिशेने येणारी वाहने – ९१.७ टक्के
- पदपथावरील अडथळे – ९० टक्के
- अनधिकृत दुकाने आणि गर्दी – ८५.७ टक्के
- सार्वजनिक शौचालयांचा अभाव त्रास – ८५.७ टक्के