मोहोळजवळ लांबोटी येथे चकमक

पुणे : सराईत गुन्हेगार टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक उडाली. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मोहोळजवळ लांबोटी येथे घडली.

शेख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीचा साथीदार होता. त्याच्यावर हडपसर भागातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गंभीर  गुन्हे दाखल आहेत.  डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड चोरून नेल्याप्रकरणी नोमान सय्यद (वय २०, रा. हडपसर) आणि शाहरुख शेख याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उमर शकील शेख (वय २१, रा. मोहंमदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी  एका फूड डिलिव्हरी अँपवरून आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्याकरिता मोटारसायकलवरून जात होते. त्या वेळी तिनजणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल आणि ६३० रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केला. तो त्यांच्या कानावर लागला होता.

त्यानंतर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून दहशत पसरविली होती. ही घटना सय्यदनगर येथे १४ मार्च रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून सराईत नोमान सय्यद याला अटक केली होती.

नोमान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ६ गुहे दाखल आहेत. शाहरुख ऊर्फ हट्टी पसार झाला होता. तो मार्च महिन्यापासून फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ जवळ असलेल्या लांबोटी गावामध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे पथकासह मोहोळ पोलीस ठाण्यात गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लांबोटी येथे जाऊन शाहरुख याला पकडण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास  शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे. पहाटे पाचच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली. शाहरुख याला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शाहरुख याचा मृत्यू झाला.