पुणे : राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून, पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायती अशा १७ ठिकाणांवरील २२२ प्रभागांमध्ये ३९८ नगरसेवकपदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली असून, ही आचारसंहिता केवळ नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास या वेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘जिल्ह्यातील १४ नगर परिषदांपैकी बारामती ‘अ’ वर्ग नगर परिषद आहे. लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, फुरसुंगी-उरळी देवाची या पाच नगर परिषदा ‘ब’ वर्गामध्ये आहेत. ‘क’ वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरुर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरुनगर यांचा समावेश आहे. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे.
जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायती मिळून १७ ठिकाणी ३९८ सदस्यांसाठी ही निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या अर्हतेवर मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ६ लाख ३४ हजार ९४० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी ७३० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.’
या ठिकाणी प्रथमच निवडणूक
एक वर्षापूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी-उरळी देवाची नगर परिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी-उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे. या ठिकाणी ३२ नगरसेवकांची संख्या निश्चित असणार आहे. या निवडणुकीतून नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल.
प्रभाग आणि सदस्यसंख्या
या निवडणुकीत एकूण २२२ प्रभागांमधून ३९८ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. नगरपंचायतींमध्ये प्रत्येक प्रभागातून एक नगरसेवक, तर नगर परिषदांमध्ये प्रभागनिहाय दोन आणि तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगर परिषदांमधून बारामती (२१), लोणावळा (२७), दौंड (२६), तळेगाव (२८), चाकण (२५), सासवड (२२), जेजुरी (२०), इंदापूर (२०), शिरूर (२४), जुन्नर (२०), आळंदी (२१), भोर (२०), राजगुरुनगर (२१), वडगाव (१७), माळेगाव बुद्रुक(१७), फुरसुंगी-उरळी देवाची (१७) आणि मंचर (१७) अशी नगरसेवक संख्या आहे.
मतदारसंख्या आणि मतदान केंद्रांचे वाटप
१ जुलै २०२५ रोजीच्या मतदारयादीप्रमाणे जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये ६ लाख ३४ हजार ९४० मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन हजारांनी वाढली आहे. त्यानुसार मतदान केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या ५४० होती. त्यानुसार यंदा मतदान केंद्रांची संख्या सुमारे ४० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे, असे डुडी यांनी नमूद केले.
मतदान केंद्र रचना
‘अ’ व ‘ब’ वर्ग नगर परिषदांसाठी ९०० ते हजार मतदारांमागे एक मतदान केंद्र, तर थेट अध्यक्षपद असलेल्या परिषदांमध्ये ९०० मतदारांमागे एक केंद्र असे नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायतींसाठी ११०० मतदारांमागे एक केंद्र अशी केंद्रांची रचना निश्चित करण्यात आली आहे. या वर्षी प्रत्येक केंद्रावर मूलभूत सोयीसुविधा, दिव्यांग मतदारांसाठी सरकते जिने, सुविधा आणि डिजिटल माहितीफलक बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे डुडी यांनी सांगितले.
मतदान यंत्रांची व्यवस्था
- कंट्रोल युनिट – ८११
- बॅलेट युनिट १,६२२
मनुष्यबळ व्यवस्थापक
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सहा उपजिल्हाधिकारी हे ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगर परिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. ११ तहसीलदारांना ‘क’ वर्ग नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी मुख्याधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यानुसार ८१० मतदान केंद्राध्यक्ष आणि ३,२४० मतदान अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे. सर्व कर्मचारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहतील.
निर्णय घेताना काळजी
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणांच्या कार्यक्षेत्रातच आचारसंहिता असणार आहेत. त्यामुळे इतर महापालिका किंवा जिल्हा परिषद क्षेत्रात आचारसंहितेचे नियम लागू होणार नाहीत. मात्र, या दोन्ही संस्थांना कोणताही निर्णय घेताना त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे डुडी यांनी नमूद केले.
मतदान केंद्रांची संख्या
विभाग – मतदान केंद्र
- बारामती – ११५
- लोणावळा – ६३
- दौंड – ५६
- तळेगाव – ७१
- चाकण – ३६
- सासवड – ३६
- जेजुरी – २०
- इंदापूर – २७
- शिरूर – ३६
- जुन्नर – ३०
- आळंदी – ३०
- भोर – २२
- राजगुरुनगर – ३४
- वडगाव – २४
- माळेगाव बुद्रुक – २२
- फुरसुंगी-उरळी देवाची – ८४
- मंचर – २४
एकूण – ७३०
