Pune Warje Crime News Chain Snatch CCTV VIDEO : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं दिसून येत आहे. दररोज पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून खून, दरोडा, चोरीच्या कित्येक घटना समोर येत आहेत. यावरून पुणेकर व विरोधी पक्ष सातत्याने सरकार, गृह विभाग व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे येथील एका दुकानातील चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ शेअर करत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की अशा घटना थांबल्या पाहिजेत, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एका दुकानातील चोरीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एक्सवर शेअर करत म्हटलं आहे की “बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, पुणे येथील हा व्हिडीओ आहे. गुन्हेगार कसे मोकाट सुटलेत याचे हे आणखी एक उदाहरण. हे चित्र पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती. अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे.”

वारजेमधील घटनेने खळबळ

वारजे येथील किराणा मालाच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्याने दुकानात असलेल्या महिलेच्या गळ्यातील तब्बल एक लाख रुपये किमतीचं मंगळसूत्र हिसकावलं. या प्रकरणी वारजेमधील माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा चोर दुकानात गेला तेव्हा दुकानात दोन महिला होत्या. त्याने दुकानातील महिलेला दुधाची पिशवी मागितली. महिलेने फ्रिजमधून पिशवी काढली आणि काउंटरवर ठेवली. त्यानंतर चोराने खिशातून पाकीट काढलं आणि पाकिटातून पैसे काढत असल्याचा अभिनय करू लागला. हळूच तो पुढे सरकला, हात महिलेच्या चेहऱ्यासमोर नेला आणि क्षणात त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं. दुकानातील दुसरी महिला मदतीसाठी पुढे धावण्याच्या आत चोराने मंगळसूत्र हिसकावून तिथून पळ काढला.

एमआयडीसीत खुनाचा प्रयत्न

सुप्रिया सुळे यांच्या बारामती तालुक्यातील जळोची एमआयडीसी येथे खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथून अटक केली आहे. ९ ऑक्टोबरच्या रात्री तीन जणांच्या टोळीने जळोची येथील पान शॉपवर उभ्या एका इसमावर कोयत्याने वार केले होते. पोलिसांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.