पुणे : हवाई दलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला. तिच्याकडून पाच लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
सुधा राजेश चौगुले (३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार ७८ वर्षीय निवृत्त अधिकारी आणि त्यांची पत्नी घोरपडीतील सोपानबाग परिसरात राहायला आहेत. त्यांच्या घरी आरोपी चौगुले ही घरकाम करायची. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातील पाच लाख ८७ हजारांचे सोन्याचे हिरेजडीत दागिने चाेरून नेले होते. २७ ऑगस्ट रोजी कपाटातून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
सुरुवातीला या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चौगुलेची चौकशी केली. चौकशीत पोलिसांचा संशय बळावला. तांत्रिक तपास, तसेच चैाकशीत चौगुलेने चोरी केल्याचे उघडकीस आले. चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, अभी चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सिंहगड रस्ता भागातील दवाखान्यात चोरी
सिंहगड रस्ता भागातील दवाखान्यातून संगणक चाेरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका डाॅक्टरांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डाॅक्टारांचा नऱ्हे भागात दवाखाना आहे. चोरट्यांनी दरवाजा उचकटून दवाखान्यातील संगणक चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार बांदल तपास करत आहेत. बाणेर भागातील एका ओैषध विक्री दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील ९० हजारांची रोकड आणि सोन्याचे नाणे चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे बाणेर परिसरातील ज्युपिटर हाॅस्पिटलसमोर ओैषध विक्रीचे दुकान आहे. चोरट्यानी २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड आणि सोन्याचे नाणे असा ऐवज चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.