पुणे: दिवाळीत मोठ्या प्रमाणात उडवलेल्या फटाक्यांमुळे पुण्याच्या बिघडलेल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये अद्याप सुधारणा झालेली नाही. सफर प्रणालीवरील माहितीनुसार पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५६ असून, पुण्याची हवा अपायकारकच असल्याचे दिसून येत आहे.
मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर हवामान कोरडे होऊन हवेतील धुलिकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरातील गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. मात्र प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर मोठ्या प्रमाणात फटाके उडवल्याने पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांकात धुलिकणांचे प्रमाण ३५०च्या पलीकडे गेले. त्यामुळे हवेची गुणवत्ता अतिवाईट श्रेणीमध्ये गेली होती.
हेही वाचा… मनोज जरांगे पाटील जेजुरी गडावर, आरक्षणासाठी खंडोबाला साकडं घालत म्हणाले, “मी एक इंचही..”
दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी तुलनेने कमी फटाके उडवले गेल्याने हवा गुणवत्ता निर्देशांकांत काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र सफर प्रणालीवरील आकडेवारीनुसार गुरुवारी पुण्याचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १५६ होता. हवा गुणवत्ता निर्देशांक १०० पेक्षा जास्त असल्यास ती हवा आरोग्यासाठी अपायकारक मानली जाते. त्यामुळे पुण्याची हवा अद्याप पूर्णपणाने पूर्वपदावर आलेली नसल्याचे दिसून येते.