फेसबुक, व्हॉट्स अॅप अशा समाजमाध्यमांतून दाखविल्या जाणाऱ्या प्रलोभनांना सुशिक्षित मंडळी बळी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुणे शहरात गेल्या वर्षी अशा प्रकारचे पंचवीस गुन्हे सायबर गुन्हे शाखेकडे नोंदविण्यात आले. विवाहाचे आमिष, नोकरीचे आमिष किंवा परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष अशा प्रकारे सायबर भामटे सुशिक्षितांना हातोहात गंडा घालत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीशी ओळख वाढवू नका तसेच प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे शहर आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांचा वापर वाढला. काही वर्षांपूर्वी समाजमाध्यमांचा वापर करणारी व्यक्ती ही विशिष्ट वर्गातील मानली जायची. आजमितीला समाजमाध्यमांचा वापर सामान्य व्यक्ती देखील सहजतेने करत आहेत. परंतु समाजमाध्यमांच्या वापर करून केल्या जाणाऱ्या गुन्ह्य़ांना (सायबर गुन्हे) सुशिक्षित बळी पडत असल्याचे निरीक्षण पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने नोंदविले आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून गेल्या दोन महिन्यांत फसवणूक होण्याचे गुन्हे वाढले आहेत. अशा प्रकारचे चार ते पाच गुन्हे दाखल झाले आहेत. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे तसेच विवाहाचे आमिष दाखवून सायबर भामटय़ांनी काही जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपळे-निलख येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय संगणक अभियंता तरुणीला विवाहाचे आमिष दाखविणाऱ्या भामटय़ाने तिला भेटवस्तू पाठवितो असे सांगितले. त्या भामटय़ाने इंग्लडमध्ये डॉक्टर असल्याची बतावणी या तरुणीकडे केली होती. भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने तिला ३८ लाख २२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्या अनुषंगाने सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये बळी पडणारे हे उच्चमध्यमवर्गीय सुशिक्षित आहेत. विशेष म्हणजे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे अशा गुन्ह्य़ांमध्ये फसविले जात आहेत. घटस्फोटीत आणि पतीच्या निधनामुळे एकाकी जगणाऱ्या तरुणींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे निरीक्षण आहे. फसवणूक करणारे भामटे फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधतात. विवाहाचे आमिष आणि परदेशात उच्चपदावर असल्याची बतावणी करणाऱ्या भामटय़ांचे फेसबुक प्रोफाइलची नीट पडताळणी केली असता त्यांना मित्र देखील (फेसबुक फेंड्र्स) नसतात. त्यामुळे भामटय़ांकडून दाखविल्या जाणारी प्रलोभने किंवा मैत्रीच्या विनंतीला प्रतिसाद देऊ नये, हा फसवणूक टाळण्याचा उत्तम उपाय आहे.
बऱ्याचदा विवाहाचे आमिष दाखविणारे संदेश आल्यानंतर त्याची माहिती निकटवर्तीयांना देणे गरजेचे आहेत. बऱ्याचदा अशा गोष्टी लपवून ठेवून भामटय़ांशी संपर्क साधला जातो. फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली जाते, असेही पवार यांनी सांगितले.
देशातूनच केला जातो फसवणुकीचा उद्योग
समाजमाध्यमांचा वापर करून फसवणूक करण्याच्या गुन्ह्य़ांना नायजेरियन फ्रॉड असे म्हटले जाते. ज्याला फसवायचे असते त्याच्याशी परदेशातील सीमकोर्डचा वापर करून भामटे संपर्क साधतात. वास्तविक हे कॉल आपल्याच देशातून केले जातात. हजारो पौंडांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे भामटे परदेशातून नव्हे तर आपल्याच देशात बसून असे उद्योग करतात. मध्यंतरी नोकरीच्या आमिषाने देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या दिल्लीतील भामटय़ांना सायबर गुन्हे शाखेने गजाआड केले होते. समाजमाध्यमांचा वापर करून आमिष दाखविणाऱ्या भामटय़ांपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2016 रोजी प्रकाशित
सुशिक्षित ठरत आहेत सायबर भामटय़ांचे बळी…
फेसबुक, व्हॉट्स अॅप अशा समाजमाध्यमांतून दाखविल्या जाणाऱ्या प्रलोभनांना सुशिक्षित मंडळी बळी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-04-2016 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quite educated cyber crime victim