पुणे : धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडणे तसेच नैराश्यातून रेल्वेगाडीखाली आत्महत्या करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. पुणे विभागात लोहमार्गावर गेल्या वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू झाला असून लोहमार्गावर मृत्यू होण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलिसांनी नोंदविले आहे.
लोहमार्ग ओलांडणे बेकायदा आहे. लोहमार्ग बेकायदा ओलांडल्यास रेल्वे कायद्यान्वये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या पुणे विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, दौंड, मिरज, साेलापूर, कोल्हापूर, अहमदनगर ही महत्त्वाची स्थानके लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येतात. लोहमार्ग धोकादायक पद्धतीने ओलांडताना अपघात घडतात. रेल्वे गाडीच्या धडकेने नागरिकांचा मृत्यू होतो. आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरणातून रेल्वेगाडी खाली उडी मारुन आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या घटनांची नोंद लोहमार्ग पोलिसांकडून घेतली जाते. अपघाती मृत्यू म्हणून नोंद पोलिसांकडून केली जाते.
गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर (२०२२) या कालावधीत लोहमार्ग पोलीस दलाच्या पुणे विभागात ४६४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस दलाच्या पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. लोहमार्ग पोलिसांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. लोहमार्गाची सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) आहे. लोहमार्गावर प्रत्येकी ठिकाणी बंदोबस्त ठेवणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पायपीट वाचविणे जिवावर
पुणे-लोणावळा लोहमार्ग तसेच शहरी भागातून जाणाऱ्या लोहमार्गावर अपघाती मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. पायपीट वाचविण्यासाठी (शाॅर्टकट) नागरिक लोहमार्गावरून जातात. धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडताना अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण शहरी भागात जास्त असल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नोंदविले. कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरण, आर्थिक विवंचनेतून रेल्वेगाडीखाली उडी मारुन आत्महत्या करण्याच्या घटना घडतात.
लोहमार्ग अपघाती मृत्यूची संख्या
वर्ष अपघाती मृत्यू
२०१९ ६२८
२०२० २८८
२०२१ ३७७
२०२२ ४६४