अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम

पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे ते दौंड रेल्वेमार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे या टप्प्यातील रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होऊ शकणार आहे. इतर तांत्रिक कामेही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असून, ती पूर्ण होताच या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाने गाडय़ा धावू शकतील.

देशाच्या विविध भागांतून पुण्यापर्यंत येणाऱ्या आणि पुणे मार्गाने पुढे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ांसाठी पुणे-दौंड मार्ग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. करोनाच्या प्रादुर्भावामुळे या टप्प्यात सध्या पुणे-दौंड डेमू लोकलला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ही सेवाही या मार्गावरील महत्त्वाचा घटक आहे. या मार्गाची व्यस्तता आणि प्रवाशांची गाडय़ांची मागणी लक्षात घेता या भागातून रेल्वे गाडय़ा वेगाने धावण्यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी या मार्गाचे संपूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेही गाडय़ांच्या वेगांत काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी वेगवाढीसाठी सिग्नल यंत्रणेच्या अत्याधुनिकीकरणाची आवश्यकता लक्षात घेता त्याबाबतचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले होते.

पुणे-दौंड रेल्वे मार्गाच्या टप्प्यामध्ये पुणे रेल्वेच्या संकेत आणि दूरसंचार विभागाच्या वतीने अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा (डबल डिस्टेंट सिग्निलग) बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या टप्प्यात १७ नवे सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ३६ सिग्नलमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून रेल्वे चालकाला पूर्वसूचना मिळू शकते. त्याच्या आधारावर चालक गाडीचा वेग वाढवू शकतो.

त्याचप्रमाणे रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीसाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या टप्प्यातील लोहमार्गासह इतर तांत्रिक कामेही युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर ताशी १३० किलोमीटर

वेगाने रेल्वेगाडय़ा धावू शकतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.