लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: केंद्र सरकारने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ‘वन नेशन, वन प्रॉडक्ट’ म्हणजेच एक स्थानक, एक उत्पादन योजना राबवली जात आहेत. यात देशभरातील ७२८ स्थानकांवर स्थानिक उत्पादनांची विक्री केंद्रे सुरू झाली असून, त्यात महाराष्ट्रातील ६२ स्थानकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील स्थानकांवर प्रामुख्याने मसाले, लोणची यासह इतर पदार्थांची विक्री होत आहे.
एक स्थानक, एक उत्पादन योजनेतून स्थानिक आणि देशी उत्पादनांना विक्रीचा मंच उपलब्ध करून दिला जात आहे. समाजातील छोट्या घटकांना यामुळे आर्थिक पाठबळही मिळत आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर दर्शनी भागात स्थानिक उत्पादनांसाठी विक्री केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. तिथे स्थानिक उत्पादनांची विक्री केली जात आहे. या योजनेची सुरूवात मागील वर्षी २५ मार्चला झाली. यावर्षी १ मेपर्यंत २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७२८ स्थानकांवर ७८५ विक्री केंद्रे सुरू झाली आहेत. या विक्री केंद्राची रचना नॅशनल डिझाईन इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा… खडकवासला धरणात बुडणाऱ्या पाच मुलींचे प्राण वाचवणाऱ्या संजय माताळेंचे सर्व स्तरातून होतंय कौतुक
या योजनेत संबंधित विभागातील स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिले जात आहे. ईशान्य भारतात स्थानिक कपडे, तागाच्या उत्पादनांची विक्री होत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुका मेवा आणि काश्मिरी कावा यांची विक्री केली जात आहे. दक्षिण भारतात मसाले, हातमागावरील साड्यांची विक्री होत आहे. पश्चिम भागात एम्ब्रॉयडरी आणि जरीच्या साड्या, स्थानिक फळे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांची विक्री होत आहे. याचबरोबर संबंधित स्थानकाच्या परिसरातील स्थानिक उत्पादनांची विक्री केली जात आहे.
हेही वाचा… कोकणातील कातळशिल्पांच्या अभ्यासासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय प्रकल्प
राज्यातील एक स्थानक एक उत्पादन केंद्रे
अहमदनर, आकुर्डी, अमरावती, नवीन अमरावती, औरंगाबाद, बडनेरा, बल्हारशाह, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, भंडारा रोड, बोरिवली, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचवड. चर्चगेट, दादर (डीआर), दादर (डीडीआर), दोंडाईचा, गंगाखेड, घाटकोपर, गोंदिया, हिंगोली, इगतपुरी, इतवारी, जालना, कलबुर्गी, कल्याण, कर्जत, किनवट, कोल्हापूर, कुर्ला, लातूर, लोणावळा, मनमाड, मिरज, मुलुंड, मुंबई सेंट्रल, नागरसोल, नागपूर, नाहूर, नांदेड, नाशिक रोड, पालघर, पंढरपूर, परभणी, परळ, पिंपरी, पुणे, पूर्णा, रोटेगाव, सांगली, सफाळे, सातारा, सेलू, शेगाव, शिवाजीनगर, सायन, सोलापूर, तळेगाव, ठाणे, तुमसर रोड, वाशीम
महाराष्ट्रात प्रामुख्याने कशाची विक्री?
- घरगुती बनवलेले मसाले
- चिक्की
- भडंग
- शेंगलाडू
- लोणची
- स्थानिक फळे आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ
- पापड
- संबंधित स्थानकाच्या परिसरातील स्थानिक उत्पादने