पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात वादळी वारे, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांसाठी पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
यंदाचा मे महिना उष्म्यापेक्षा पावसाळी ठरला. त्यातच मोसमी वाऱ्यांचे दहा ते पंधरा दिवस लवकर आगमन झाले. त्यामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मात्र, जून महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षी कमी पाऊस नोंदवला गेला आहे.
१४ जूननंतर पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दिवस पुणे जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ आहे. विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वादळी वारे, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.