पुणे : शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ असे संमिश्र वातावरण असून, कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उष्माही जाणवू लागला आहे. मात्र, २ जुलैपर्यंत आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची, तर घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील काही भाग, विशेषत: घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला आहे. कुरवंडे, ताम्हिणी, लोणावळा, भोर अशा ठिकाणी अनेकदा एका दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, आता घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच शहर आणि जिल्ह्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसभरात कुठे तरी पावसाची एखादी हलकी सर पडते. कधी स्वच्छ ऊन पडते, तर काही वेळा वातावरण ढगाळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील कमाल तापमान ३० अंशांवर गेले आहे. संमिश्र हवामानामुळे दिवसभरात उष्माही जाणवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कुरवंडे येथे ५६.५ मिलिमीटर, भोर येथे २७,५, निमगिरी येथे १४ मिलिमीटर पाऊस पडला. तर रात्री साडेआठपर्यंत चिंचवड येथे दोन मिलिमीटर, लवळे येथे ३.५, कोरेगाव पार्क येथे एक, तर शिवाजीनगर येथे ०.३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.