पुणे : शहर परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा शहर ‘खड्ड्यात’ गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडी, माती आणि वाळू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरभर रस्त्यांच्या झालेल्या या दुरवस्थेनंतर महापालिका प्रशासन आता जागे झाले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ‘खड्डेमुक्त रस्ते’ मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे खड्डे पडून माती, खडी रस्त्यांवर दिसत आहे. महापालिकेकडे रस्ते झाडण्यासाठी मोठी यंत्रणा असूनही खडी, माती काढली जात नसल्याने वाहनचालकांना गाडी चालविताना त्रास होत आहे.

रस्त्यात पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती पेठांच्या भागांसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा अपयशी ठरत असल्याने अनेक महत्त्वाच्या रस्त्यांसह चौकांमध्ये पाणी साठून राहत आहे.

यामधून वाहन काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेली माती, बारीक खडी, वाळू रस्त्यांवर पसरल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पावसाळी गटारे, तसेच सांडपाणीवाहिन्या स्वच्छ केल्या जातात. ठेकेदारामार्फत ही कामे केली जातात.

स्वच्छ केलेले चेंबर आणि त्याच्या भोवती जमा होणारा कचरा, माती, खडी उचलून टाकणे ही जबाबदारी ठेकेदाराची असते. मात्र याकडेही दुर्लक्ष केले जाते. शहरातील रस्त्यांची नियमितपणे झाडलोट करताना खडी, माती महापालिकेचे कर्मचारी एका बाजूला गोळा करून ठेवतात. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खडी आणि माती आढळून येत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. महापालिका नागरिकांकडून विविध प्रकारचे कर घेते, मग चांगले रस्ते का देत नाही? – मकरंद पाटील, नागरिक, वारजे.

पावसामुळे रस्त्यांवर वाहून आलेली माती, खडी उचलण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला दिला आहे. काही चौकांमध्ये तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. लवकरच महापालिकेच्या वतीने खड्डेमुक्त रस्ते मोहीम राबविली जाईल. – नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका.