पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने बैठका आणि मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौर्यावर आले होते. त्या वेळी शाखा अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले, असे पाहायला मिळाले.
या बैठकीत राज ठाकरे यांच्या समोर मुळशी पॅटर्न या चित्रपटातील कलाकार आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश उर्फ पिट्या परदेशी बसले होते. राज ठाकरे यांचे लक्ष पिट्या परदेशीकडे गेले आणि काही दिवसांपूर्वी पिट्या परदेशी यांनी आरएसएसच्या संचलनादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ‘आरएसएसचा कट्टर समर्थक’ असा मजकूर लिहिला होता, हे लक्षात आले. हा फोटो राज ठाकरे यांनी पाहिल्याचं लक्षात येताच, “छाती ठोकपणे सांगत होतास, मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग इकडे कशासाठी टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा.” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पिट्या परदेशीला झापल्याचे पाहायला मिळाले.
