छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे करण्यापेक्षाही त्यांची खरी स्मारकं असलेल्या गडकोट-किल्ले पोखरले जात आहेत, त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले. गड-किल्ले हीच शिवरायांची स्मारकं असताना अरबी समुद्रातील स्मारकाची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गार्डियन, गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनियिरगच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक एन. के. ऊर्फ आबासाहेब महाजन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गार्डियनचे अध्यक्ष मनीष साबडे, गिरिप्रेमी संस्थेचे संचालक उमेश झिरपे, विजय जोशी, सल्लागार समिती सदस्य उष:प्रभा पागे, आनंद पाळंदे आणि माजी महापौर माऊली शिरवळकर या वेळी उपस्थित होते.
‘‘बाबासाहेब पुरंदरे यांनी पारदर्शकतेने इतिहास मांडला. शिवाजी या तीन अक्षरांसाठी आयुष्य वेचलेल्या बाबासाहेबांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून कसले घाणेरडे राजकारण करता,’’ असा सवालही राज ठाकरे यांनी केला. ‘‘गड-किल्ल्यांवर जाणे ही एक कला आहे. मात्र, आता डोंगरच्या डोंगर एक तर खासगी मालकीने विकले तरी जात आहेत किंवा पोखरून तरी काढले जात आहेत. अमेरिकेमध्ये असे प्रकार घडण्याची सुरूवात झाली तेव्हा तेथील चित्रकारांनी अशा निसर्गदृश्यांची चित्रे चितारून प्रदर्शन भरविले आणि ही दृश्ये आता केवळ चित्रांतूनच पहावी लागणार असे सूचित केले. त्यानंतर अब्राहम िलकन यांनी नायगरा धबधबा आणि ग्रँट केनियन हे ताब्यात घेऊन राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केले. लवासा आणि अॅम्बी व्हॅली अशा खासगी प्रकल्पांमुळे आमचाच निसर्ग आम्हाला पैसे देऊन बघावा लागत आहे. पर्वतीवर तर गवत उगवावं तशा झोपडय़ा उगवल्या. गड-किल्ल्यांवर गिर्यारोहकांचा राबता असेल तर हे होणार नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.
गड-किल्ल्यांवर फिरण्याची आवड, गडांची वैशिष्टय़े, गडांवर फिरताना आलेले चांगले अनुभव आणि कटू प्रसंग यांना उजाळा उत्तरार्धातील बाबासाहेब पुरंदरे आणि एन. के. महाजन यांच्याशी झालेल्या मुलाखतीतून मिळाला. राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. इतिहासाचा अभ्यास, संशोधन, चिकित्सा आणि चर्चा झाली पाहिजे. पण, हे करताना इतिहासाची आणि महापुरुषांची कुचेष्टा होता कामा नये, असे पुरंदरे यांनी सांगितले. गिर्यारोहण करताना गडावर  चढण्यामध्ये येणारी मजा पैसे देऊनही विकत घेता येत नाही, असे महाजन यांनी सांगितले.

यालाच लोकशाही म्हणतात
ज्याने जेमतेम दोन-चार किल्ले चढले असतील अशा माझ्या हातून या महनीय व्यक्तींचा सत्कार झाला. त्यामुळे, ‘कसंनुसं होणं’ म्हणजे काय, याचा अनुभव मी घेतला. पण, यालाच लोकशाही म्हणतात, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. शाळेत असताना मी अभ्यासामध्ये फारसा हुशार नव्हतो. त्यामुळे असं कसंनुसं व्हायला लागू नये म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे मी थांबवले, असे सांगतानाच राज ठाकरे यांनी ‘वयोवृद्ध व्हावं तर असं’ अशी इच्छा प्रदर्शित केली.