Ravindra Dhangekar vs Charity Commissioner Status Quo : पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याची दखल घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहेच. मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात आज (२० ऑक्टोबर) याप्रकरणी सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, या कथित जमीन विक्रीच्या घोटाळ्याविरोधात लढत असलेले शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शंका उपस्थित केली आहे. धंगेकर म्हणाले, “या धर्मादाय आयुक्तांना स्टेटस्को देण्याचा अधिकार काय? मुळात तेच या घोटाळ्यातील आरोपी आहेत.”
धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय? असा प्रश्न रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. मुळात धर्मादाय आयुक्त यांच्या संगन्मतानेच हा व्यवहार झालेला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करायला हवा. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या इतर सर्व साथीदारांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
धर्मादाय आयुक्तांचा मेंदू तपासायला पाहिजे : धंगेकर
माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “धर्मादाय आयुक्तांच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती अमोघ कलोटी यांचा मेंदू तपासायला पाहिजे. त्यांना काही समजत नाही का? मुळात निर्णय कोणी घेतला? त्यांनीच घेतला. आता त्यांनीच खालच्या कार्यालयात पाठवला आहे. हा सगळा जनतेला मुर्खात काढायचा प्रयत्न आहे.”
धर्मादाय आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
“धर्मादाय आयुक्त यांना स्थगितीचा अधिकार काय? त्यामुळे आयुक्तांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. हा मूर्ख माणूस धर्मादाय आयुक्तांच्या खुर्चीवर बसलाय. हे आयुक्त मुळात नालायक आहेत आणि तेच स्थगितीची भाषा करत आहेत. मुळात व्यवहार करताना त्यांच्या संगन्मतानेच हा व्यवहार झाला आहे. ते स्वतः या व्यवहारातील आरोपींचे साथीदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वात आधी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्या संगन्मताने केलेला हा व्यवहार आहे.”
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
“पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. यासह या व्यवहारातील बँकेचे व्यवस्थापक व संचालक हे देखील आरोपी आहेत. हा व्यवहार चुकीचा आहे. आता चौकशी करणार, यासंबंधीची फाईल इथून तिथे पाठवणार असं सगळं चाललंय. मुळात ज्याने व्यवहार केला आहे त्याला हा धर्मादाय आयुक्त नालायक ठरवणार का? ते स्वतःच्या बॉसविरोधात निकाल देणार का? हा सगळा जनतेला मूर्खात काढायचा प्रकार आहे. केवळ विरोधाभास निर्माण केला जात आहे.”
ईडीमार्फत चौकशीची मागणी
धंगेकर म्हणाले, “या व्यवहारात धर्मादाय आयुक्त सर्वात चुकीचे आहेत. या सगळ्या व्यवहारात त्यांची चौकशी व्हायला हवी. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी व्हायला पाहिजे.”