भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९६५ मध्ये झालेल्या युद्धाच्या आठवणींना शुक्रवारी महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांकडून उजाळा देण्यात आला. महार रेजिमेंटकडून आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मेजर जनरल पी. शेर्लेकर आणि ब्रिगेडियर अरुण अधिकारी यांच्या हस्ते मेजर एस. व्ही. साठे आणि लेफ्टनंट कर्नल विक्रम चव्हाण या दोन वीर योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा >>> पुणे : “…मी नाराज आहे,” भाजपा खासदार गिरीश बापट स्पष्टच बोलले; म्हणाले “पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक…”
३ सप्टेंबर १९६५ ला नऊ महार रेजिमेंटने तत्कालीन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल डी. एन. सिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन रिडल’ यशस्वी करत जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर भागात पाकिस्तानी तुकड्यांना धूळ चारली. त्या पराक्रमाचे स्मरण म्हणून पुण्यातील ज्येष्ठ सैनिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. महार रेजिमेंटच्या नवव्या बटालियनची एमएमजी बटालियन म्हणून स्थापना १ ऑक्टोबर १९६२ ला सौगोर येथे झाली. स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बटालियनचे इन्फंट्री बटालियनमध्ये रूपांतर करण्यात आले. या रूपांतरणामध्ये शस्त्रे, उपकरणे, प्रशिक्षण, संघटना आणि बटालियनच्या मूलभूत कार्यामधील बदल समाविष्ट होते. जून १९६५ मध्ये स्थापनेच्या अवघ्या तीन वर्षांतच या रेजिमेंटला जम्मू आणि काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले.
हेही वाचा >>> भोंग्याच्या मुद्द्याचं पुढे काय झालं ? विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंना सवाल
भारत पाकिस्तान युद्धाच्या चकमकी सुरू झाल्यावर अवघ्या एका रात्रीत या बटालियनला ४१ माउंटन ब्रिगेड अंतर्गत अखनूर येथे पाठवण्यात आले. तेथील चंब-जौरियन मार्गावर भारताचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी या बटालियनवर सोपवण्यात आली. १ आणि २ सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री या मार्गावरील ट्रोटी येथे पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच या बटालियनला पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांना सामोरे जावे लागले. बचावासाठी केवळ चार तासांचा अवधी मिळाला होता. ३ सप्टेंबर १९६५ ला सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने ट्रोटीवर ताबा मिळवण्यासाठी सर्व ताकद वापरली, मात्र लेफ्टनंट कर्नल डी. एन. सिंह आणि मेजर एस. व्ही. साठे आणि मेजर विक्रम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बटालियनने पाकिस्तानशी दोन हात करत ट्रोटीवरील भारताचे वर्चस्व राखले. तीन रात्री चाललेल्या या युद्धात १७ जवान, अधिकारी शहीद झाले होते.