पुणे : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण निश्चित झाल्याने काही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, आरक्षण लक्षात घेऊन नव्याने मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदांपैकी चार ठिकाणी आणि चार नगरपंचायतींपैकी तीन ठिकाणच्या नगराध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे. आठ नगर परिषदांची नगराध्यक्षपदे सर्वांसाठी खुली राहणार आहेत.
राज्यातील २४७ नगर परिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठीचे आरक्षण सोमवारी निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणही निश्चित झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी-उरूळी देवाची, लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. शिरूर, जुन्नर आणि दौंड या तीन नगर परिषदांमधील नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. चाकण नगरपरिषद खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, बारामती, सासवड, तळेगाव दाभाडे, इंदापूर आणि भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
मंचर नगरपंचायतीसाठी ओबीसी प्रवर्गातून महिला नगराध्यक्षाची, वडगाव-मावळ आणि देहू नगरपंचायतीसाठी खुल्या प्रवर्गातून महिला नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडला जाणार आहे.
नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीचे आरक्षण निश्चित झाल्याने जिल्ह्यातील राजकारणाचा पटही बदलला आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती. मात्र, आरक्षणात बदल झाल्याने राजकीय समीकरणांतही बदल झाला आहे. अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने काही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे, तर नव्या आरक्षणानुसार इच्छुकांनी रणनीती आखण्यासही सुरुवात केली आहे.
दरम्यान, नगरपरिषदांच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील बारामती आणि फुरसुंगी या दोन नगर परिषदांमध्ये अनुक्रमे ४१ आणि ३२ इतकी सर्वाधिक सदस्यसंख्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. फुरसुंगी, भोर या नगर परिषदा, तर मंचर आणि माळेगाव या दोन नगरपंचायतींचा गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीवेळी समावेश नव्हता. या वेळी त्यांच्याही निवडणुका होणार आहेत. तर, फुरसुंगी नगर परिषदेची प्रथमच निवडणूक होणार आहे. नगरपंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत आहे. बहुतांश नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आहे. ज्या ठिकाणी विषम सदस्यसंख्या असेल, त्या ठिकाणी एक प्रभाग त्रिसदस्याचा असणार आहे.
असे असेल आरक्षण
नगर परिषदा :
अनुसुचित जाती प्रवर्ग : फुरसुंगी-उरूळी देवाची आणि लोणावळा नगरपरिषद
नागरिकांचा मागास प्रवर्ग : शिरूर (महिला), जुन्नर (महिला), दौंड (महिला)
खुला प्रवर्ग : चाकण (महिला), राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, बारामती, तळेगाव-दाभाडे, सासवड, भोर आणि इंदापूर
नगरपंचायती :
अनुसूचित जाती प्रवर्ग : माळेगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग : मंचर (महिला), खुला प्रवर्ग राखीव : वडगाव मावळ (महिला), देहू (महिला)