पुणे : शहरातील मध्यवर्ती भागासह पुणे कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका, कटक मंडळ प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरू केली नाही. त्यामुळे रस्त्यावर अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप अखिल भारतीय मजदूर काँग्रेसने गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.

‘रस्त्यांच्या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे? खड्डे पडलेल्या रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार का?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करत संघटनेते डॉ. अनुपम बेगी यांनी महापालिका आणि कटक मंडळातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघातांची जबाबदारी स्विकारून प्रशासनाने नागरिकांकडून तीन महिन्यांचा कर घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनोज लाल बेगी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, सचिव चेतन जेधे उपस्थित होते.

डॉ. बेगी म्हणाले,‘पुणे शहरात आणि कटक मंडळ परिसरात रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. मात्र, परिसरातील कोणत्याही रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. महापालिका, कटक मंडळाकडून वेळेवर कर घेण्यात येतो. मात्र, रस्त्यांची देखभाल केली जात नाही. खडड्यांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.’

‘महापालिका, कटक मंडळाकडून नियमितपणे कर घेतला जातो. मात्र, रस्त्यांची नियमित देखभाल केली जात नाही. आता प्रशासनाने या खड्ड्यांची जबाबदारी स्विकारून पुणेकरांचा तीन महिन्यांचा कर माफ करायला हवा,’असेही ते म्हणाले.

महापालिका आणि कटक मंडळाने रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने डॉ. बेगी यांनी दिला.

महापालिका, कटक मंडळाकडून वेळेवर कर घेण्यात येतो. मात्र, रस्त्यांची देखभाल केली जात नाही. खडड्यांमुळे रस्त्यावर अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.– डॉ. अनुपम बेगी, अध्यक्ष, अखिल भारतीय मजदूर काँग्रेस</p>