पुणे: महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांकडून मिळकतकर वसूल करण्यास राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र असे असतानाही या गावांतील सुज्ञ नागरिकांनी गेल्या दोन महिन्यांत तब्बल ३० कोटी ४४ लाख रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. राज्य सरकारने स्थगिती दिल्याने महापालिकेच्या मिळकतकर विभागाने या गावातील नागरिकांना मिळकतकराच्या बिलांचे वाटप केलेले नाही. केवळ देयके (बिले) तयार करून ठेवली असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकतकर घेण्यास मनाई केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. महापालिकेने या गावांतील मिळकतकर कमी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवावा, त्यानंतर ही स्थगिती उठविली जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. मात्र सहा महिने उलटून गेल्यानंतरही महापालिकेकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
राज्य सरकारने समाविष्ट गावांकडून मिळकतकर घेण्यास मनाई केली असली तरी हा मिळकतकर भरावाच लागणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे या गावांतील अनेक सुज्ञ नागरिकांनी महापालिकेने चालू आर्थिक वर्षाची बिले दिली नाही तरी ऑनलाइन तसेच रोख रकमेच्या स्वरूपात मिळकतकराचे बिल भरण्यास सुरुवात केली आहे. १ एप्रिल ते १२ मे या काळात या गावांतून ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळकतकरापोटी महापालिकेकडे भरण्यात आल्याचे उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या या ३२ गावांमध्ये सुमारे साडेचार लाख मिळकती आहेत. त्यापैकी सुमारे २२ हजार मिळकतदारांनी १२ मे पर्यंत मिळकतकर जमा केला आहे. गेल्या वर्षी देखील या गावांतून ३०० कोटी रुपयांचा मिळकतकर नागरिकांनी महापालिकेकडे जमा केला होता. या गावांकडे महापालिकेची साडेआठशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेची मिळकतकराची थकबाकी कधीतरी भरावीच लागणार आहे. आता नाही भरली तर राज्य सरकारने स्थगिती उठविल्यानंतर प्रलंबित थकबाकी महापालिका तातडीने भरायला लावेल. त्यावेळी त्याचा अधिक भार पडू नये, यासाठी अनेक नागरिक मिळकतकर भरत असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
समाविष्ट गावांतील नागरिकांची मिळकतकराची बिले महापालिकेने तयार करून ठेवली आहेत. राज्य सरकारची स्थगिती असल्याने त्याचे वाटप केलेले नाही. मात्र १२ मे पर्यंत ३० कोटीपेक्षा अधिक मिळकतकर या गावांतील नागरिकांनी महापालिकेकडे भरला आहे. – प्रतिभा पाटील, उपायुक्त,मिळकतकर विभाग, पुणे महापालिका