त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटल्याचे दिसून आले. अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात विशेष दक्षता घेतली गेली असून, आता याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हय़ात आजपासून (१४ नोव्हेंबर) ते २० नोव्हेंबर पर्यंत कलम १४४ नुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी परिपत्रक काढून दिली आहे.

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि करंजा या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आज १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर जातीय तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी पसरविता येणार नाही. तसेच आक्षेपार्ह पोस्ट व्हॉटसअप किंवा फेसबुकवर आढळल्यास संबधीत व्यक्ती, ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई केली जाईल.त्याच बरोबर १४ ते २० नोव्हेंबरच्या काळात सभा, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. शस्त्र, लाठी, काठी जवळ बाळगता येणार नाही. या गोष्टीची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.