scorecardresearch

पुणे : महाआघाडीने किती उद्योग आणले? ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

‘फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून विनाकारण वाद सुरू आहे.

पुणे : महाआघाडीने किती उद्योग आणले? ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

‘फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून विनाकारण वाद सुरू आहे. महाविकास आघाडीने चांगल्या पायाभूत सोयी-सुविधा पुरविल्या असत्या, तर प्रकल्प गुजरातला गेलाच नसता. सत्तेवर होतो तेव्हा तीन तिघाडा काम बिघाडा, अशी अवस्था सरकारची होती. सरकारमध्ये ताळमेळ नव्हता. आता टीका, आरोप करण्यापेक्षा महाविकास आघाडीने राज्यात अडीच वर्षांत किती उद्याोग आणले, हे जाहीर करावे,’ असे खुले आव्हान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यात २२१ जणांना नव्याने करोना संसर्ग

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे म्हणाले, “आता शरद पवार टीका करीत आहे, पण महाविकास आघाडीने अडीच वर्षांत राज्यात किती प्रकल्प आणले हे जाहीर करावे. करोना काळात केंद्राच्या मदतीच्या जोरावर उपाययोजना सुरू होत्या. महाविकास आघाडीतील नेते आता शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. पण, आमच्यावर टीका केली म्हणून त्यांचे पाप झाकले जाणार नाही.”

हेही वाचा >>> पुणे : खडकवासला धरणातून हंगामातील सर्वाधिक विसर्ग ; मुठा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडले

राज्यात कॉँग्रेसचे अस्तित्वच नाही
राज्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झालेले काँग्रेसचे मंत्री जनतेसाठी काम करताना दिसले नाहीत. ते स्वत:साठीच काम करीत होते. दक्षिण भारतात राहुल गांधी यांची भारत जोडो मोहीम सुरू आहे पण, त्यांनी गोव्यात सुरू झालेल्या काँग्रेस छोडो मोहिमेकडे लक्ष द्यावे. एका आठवड्यात जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले जातील. पालकमंत्री जाहीर झालेले नसले, तरीही निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही. राज्यात गतिमान कारभार सुरू आहे, असेही विखे म्हणाले.

कृषी शिक्षणाबाबत निर्णय घेऊ
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी इयत्ता पाचवीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयाबाबत बोलताना विखे म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना इयत्ता आठवीपासून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थानाचे शिक्षण सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव ठेवला होता. आता सत्तार यांच्या सोबत बसून या बाबतचा निर्णय घेऊ. आता पारंपरिक शेती राहिली नाही, आधुनिक शेतीचे धडे देण्याचे गरज आहे.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Revenue minister radhakrishna vikhe patil asked how many industries the grand alliance brought pune print news amy