पुणे : शहरातील मंदावलेली वाहूतक आणि ठिकठिकाणी होणारी कोंडी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शहरातील २५५ रिक्षा थांबे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या शहरात एक लाख ४५ हजार रिक्षा असून, त्यांच्यासाठी ६९५ थांबे निश्चित केले आहेत.

शहरात वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण, बांधकामे आणि इतर कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे आरटीओ, वाहतूक पोलीस आणि पुणे महापालिका यांच्या वतीने नुकतेच रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये रिक्षा थांब्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ४१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा विचार करण्यात आला असून, केवळ ६९५ थांबे निश्चित करण्यात आले. उर्वरित २५५ स्थानके रद्द करून या अहवालाला प्रादेशिक परिवहन समितीने मंजुरी दिली.

परिवहन विभागाच्या २०१५ पूर्वी रिक्षांची संख्या एक लाखाच्या आत असताना ९५० थांबे मंजूर केले होते. हळूहळू रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या शहरात एक लाख ४५ हजारांपेक्षा अधिक रिक्षा असताना आरटीओने २५५ रिक्षा थांबे रद्द केले आहेत.

दरम्यान, या निर्णयाविरोधात रिक्षाचालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. रिक्षा थांबे रद्द करून नक्की कुठली वाहतूककोंडी कमी होणार आहे, वाहतूककोंडीला केवळ रिक्षाथांबे जबाबदार कसे, इतर वाहने रस्त्यावर बिनदिक्कत थांबत नाहीत का, असा प्रश्न स्वारगेट इन गेट एसटी स्टँड रिक्षा संघटनेचे सल्लागार बापू भावे यांनी उपस्थित करून थांबे वाढविण्याची मागणी केली.

रिक्षाथांब्यासंदर्भात आम्ही संयुक्त सर्वेक्षण करून, त्याचा अहवाल प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडला. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पुणे महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. थांबा ठरविताना वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. – स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

रिक्षांची संख्या वाढत असताना थांब्यांची संख्या कमी करण्याचे गणित कसे सुचले हे अद्याप लक्षात आलेले नाही. ‘आरटीओ’चे सर्वेक्षण अपुरे आहे. थांबे वाढावेत अशी आमची मागणी आहे. – नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे.